Pune : पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चाकू, दोरी, रोकड जप्त करण्यात आली.

दिलीप विठ्ठल भोई (वय २८, रा. रेल्वे स्टेशन), विकास दिलीप कांबळे (वय २५, रा. इंदिरानगर), राज्या उर्पâ विकास सिताराम लांडगे (वय ३५, रा. पुणे रेल्वे स्टेशन), रोहित शंकर पाटील (वय २२, रा. गांधीनगर, पिंपळे गुरव ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार नाग्या हा फरार झाला आहे.

शहरात वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पेट्रोलिंग व गस्त घातली जात आहे. दरम्यान युनिट चारचे पथक संगमवाडी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी परिसरातील एका पोल्ट्री फार्मवर दरोडा टाकून रोकड लुटण्याच्या तयारीत असलेली टोळी रस्त्यालगत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान, उपनिरीक्षक विजय झंझाड व त्यांच्या पथकाने सापळा रचून दिलीप, विकास, राज्या उर्फ विकास, रोहितला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चाकू, दोरी मिळून आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास उपनिरीक्षक विजय झंजाड करीत आहेत.