पुण्यातील ‘रेड लाईट’ एरियामध्ये पोलिसांचा छापा, 14 युवतींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. तर तेथून परराज्यातील तरूणींना डांबून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हे शाखेकडून कुंटणखाना चालक महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर एका महिलेला अटक करण्यात आली असून बांगलादेश, नेपाळमधील तरूणींसह चौदा जणींना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी कुंटणखाना चालक काजल गोरे तमांग (वय ५२, रा. डायमंड बिल्डींग, बुधवार पेठ, मूळ रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर इतर ३ ते ४ कुंटणखाना चालक महिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तनुजा विनायक पवार (वय ३३) यांनी याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हे शाखेच्या पथकाला बुधवार पेठेतील ताजमहल बिल्डींग, नवीन बिल्डींग, सपना बिल्डींग, डायमंड बिल्डींग या इमारतींमधील कुंटणखान्यात परराज्यातील तरूणींना डांबून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने कुंटणखान्यावर छापे टाकले.

या कारवाईत नेपाळमधील चार, बांगलादेशमधील दोन तरूणींसह एकूण चौदा तरुणींची सुटका केली. त्यांना निरीक्षण गृहात पाठविण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे आणि पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like