मुलीला पळविले म्हणून मुलाच्या आईचे अपहरण, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  मुलीला पळवून नेणाऱ्या मुलाच्या आईचे भरदिवसा अपहरण करणाऱ्यांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सिने स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळत महिलेची सुटका केली. याप्रकरणी दोन महिलांसह एका चालकाला अटक करण्यात आली आहे.

अंजली संजय घोलप (१९, वडगाव शेरी),  कविता संजय घोलप ( ४०, वडगाव शेरी) व चालक तुषार बबन चौधरी अश तिघांना अटक केली.

विश्रांतवाडी  येथील केकान पेट्रोलपंपासमोरून ३ अनोळखी व्यक्तींनी सुनंदा कृष्णा महाडिक या महिलेचे एका स्विफ्ट कारमध्ये जबरद्स्तीने बसवून नेत अपहरण केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाली अधिकारी  व कर्मचारी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर ती कार फुलगावच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. फुलगावकडे पोलीसांची गाडी गेल्यावर त्यांना माहिती मिळाली की ती कार वढू बुद्रूक कडे जात आहे. त्यानुसार ती कार एकदम वेगात कोरेगावच्या दिशेने जात असताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी लागलीच पाठलाग करत पोलिसांची गाडी आडवी लावून ती कार थांबविली.

कारमधील लोकांना बाहेर काढले. त्यावेळी तीन महिला आणि एक चालक कारमधून बाहेर आला. त्यातील एक महिला मोठ्याने रडत या तिघांनी मला मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेत असल्याचे सांगितले. त्यानतंर पोलिसांनी दोन महिलांसह एका चालकाला अटक केली. तसेच सुनंदा महाडिक या महिलेची सुटका केली. अटक केलेल्या तिघांनाही विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान महाडिक यांचा मुलगा २३ वर्षाचा असून तो खासगी कंपनीत कामाला आहे़ तर घोलप यांची मुलगी २१ वर्षांची असून ती पदवीधर आहे़. दोघांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र याला घोलप कुटुंबाचा विरोध होता. दोघांनी पळून जाऊन ३ एप्रिल रोजी विवाह केला़. त्यानंतर दोघेही पळून गेले आहेत़ घोलप हे महाडिक यांच्या घरी आले होते़. त्यांनी मुलगी कोठे आहे, याची चौकशीही केली़ पण, महाडिक यांनी आम्हाला माहिती नाही़ ते दोघेही घरी आले नसल्याचे सांगितले़. त्यानंतर ते खोटं बोलत असल्याचा त्यांना संशय होता़ त्यामुळे सुनंदा महाडिक यांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवायचे व मुलीला परत आपल्या घरी आणायचे असा प्लॅन घोलप कुटुंबियांनी आखला होता़.  परंतु, पोलिसांनी वेळीच हालचाल केल्याने त्यांचा हा कट अयशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले़

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उपनिरीक्षक निखील पवार, आनंद रावडे, कर्मचारी प्रमोद मगर, मनोज शिंदे, सुनील चिखले,विजय गुरव, रमेश गरुड, फिरोज बागवान, सचिन कोकरे, मंगेश पवार, नारायण बनकर यांच्या पथकाने केली.