बिहारमध्ये पळून जायच्या तयारीत होता दीप सिद्धू; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोप असलेला पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असतांना दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोमवारी (दि. 8) रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला करनाल येथून अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीप सिद्धू पंजाबमधून बिहारमध्ये फरार होण्याच्या तयारीत होता. बिहारमधील पूर्णिया येथे दीप सिद्धूची पत्नी आणि तिचे कुटुंबीय राहतात. त्याठिकाणी तो जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचवेळी विशेष पथकाने त्याला अटक केली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दीप सिद्धू याने आपला मोबाइल बंद करून फरार झाला होता. यानंतर सोमवारी (दि. 8) रात्री 10.30 च्या सुमारास करनाल येथे गाडीची वाट पाहत रस्त्यावर थांबला असता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हिंसाचाराच्या घटनेनंतर फरार झालेला दीप सिद्धू व्हिडिओ बनवत होता. मात्र, ते व्हिडिओ त्याची अतिशय जवळची एक महिला कॅलिफोर्निया येथून अपलोड करत होती. तपास संस्थेची दिशाभूल करण्यासाठी त्याने ही शक्कल लढवल्याचे सांगितले जात आहे.