26 गुन्हे ‘बर्क’ करणाऱ्या सहाय्यक फौजदारावर (ASI) गुन्हा दाखल

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन – कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना सन 2012 ते 2018 या काळात तपासाला दिलेले अनेक गुन्हे दीर्घकाळ प्रलंबित ठेवले व त्यातील 26 गुन्हे गायब केले. तसेच जप्त केलेला मुद्देमाल जमा न करता त्याचा अपहार केल्याप्रकरणी सहाय्यक फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी फिर्याद दिली आहे.
प्रशांत शामवेल मिसाळ हे गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. ते सध्या श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, सन 2012 ते 13 नोव्हेंबर 2018 दरम्यान सहाय्यक फौजदार मिसाळ हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. नेमणुकीस असताना त्यांच्याकडे तपासावर असलेले एकूण 68 पुणे दीर्घकालीन तपासावर प्रलंबित ठेवले. त्यात भाग 1 ते 5, भाग-6, अकस्मात मृत्यू, दारूबंदी, जळीत, मोटार वाहन कायदा आदी गुन्ह्यांचा समावेश होता. त्यांच्याकडे असलेल्या अनेक गुन्ह्यांची कागदपत्रेच हाती लागत नसल्याने पोलिस निरीक्षक मानगावकर यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना पत्र पाठवून सहाय्यक फौजदार मिसाळ यांना गुन्हे निर्गतीसाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते.
7 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान मिसाळ हे कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हे निर्मितीसाठी आले. मात्र या काळात त्यांनी एकाही गुन्ह्याची निर्गती केली नाही. त्यांच्याकडे तपासाला असलेल्या 26 गुन्हे गायब असल्याचे निदर्शनास आले. इतर सर्व गुन्हे प्रलंबित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाच्या पावत्या करून त्या जमा करण्याऐवजी सदर सदर मुद्देमालाचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी शुक्रवारी उशिरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 188, 217, 218, 201, 409 अन्वये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.