मतदारांना पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या गणेश जगदाळे यांच्या विरुद्ध अखेर दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने दिवसभर हि बातमी दाखवली होती. यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आणि आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

money

भरारी पथकातील निवडणूक कर्मचारी विलास हनुमंत भापकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून दौंड पोलिसांनी गणेश जगदाळे यांच्यावर मतदारांना पैसे वाटून आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये भा.द.वि. कलम 171(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी गणेश जगदाळे हा लिंगाळी ग्रामपंचायतीचा उप सरपंच असून तो भाजप चा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. भाजप उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी गणेश जगदाळे हा मतदारांना पैसे वाटत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची लेखी मागणी अश्विन वाघमारे यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे केली आहे. संशयित आरोपी गणेश जगदाळे यास अजून अटक करण्यात आली नसून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी तथा सहायक पालिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली.