‘त्या’ शिवसेना पदाधिकाऱ्यावरील गुन्हा अन्यायकारक ; सखोल चैकशीची मागणी

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल दाखल झालेला शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यावरील गुन्हा अन्यायकारक आहे. कलाटे यांच्यावर एकतर्फी गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. तसेच कर्मचारी अनिल राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्याकडे केली.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचे समर्थन करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, शिवसेना, अपक्ष आघाडीचे नगरसेवक तसेच सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, नगरसेवक नवनाथ जगताप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे, संदीप कस्पटे, शैलेश मोरे राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर, शाम लांडे, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, विक्रांत लांडे,राजू बनसोडे, पंकज भालेकर, रोहित काटे, नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, शिवसेनेचे नगरसेवक सचिन भोसले, निलेश बारणे, अमित गावडे, नगरसेविका मिनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे, कष्टकरी कामगार संघटनेचे बाबा कांबळे, आरपाआय वाहतूक आघाडीचे अजिज शेख आदी उपस्थित होते.

सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळानी यावेळी पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुल कलाटे यांच्यावरती १३ फेब्रुवारी रोजी सरकारी कर्मचारी अनिल राऊत यांनी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस आयुक्त यांच्या दडपणाखाली पोलीस निरिक्षकांनी कोणतीही चौकशी न करता हा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर महापालिका कर्मचारी महासंघाने चुकीची भाषा वापरत आंदोलन केले. त्यानंतर अनिल राऊत यांच्यावर संतोष कामठे यांनी गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस निरिक्षकांनी मारहानीचा गुन्हा दाखल न करता अदखल पात्र गुन्हा दाखल करून घेतला.

सर्व नगरसेवक हे जनतेचे सेवक असतात. त्यामुळे लोकांच्या कामासाठी अधिकाऱ्यांना विनंती करत असतात. तेच राहुल कलाटे यांनी त्यावेळी केले. तरी अनिल राऊत यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करून घ्यावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली.