पैश्याची मागणी करणाऱ्या ‘त्या’ अभियंत्यावर गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – ‘तू मला पन्नास हजार रुपये दिले, तर तुझे काम होईल. नाहीतर असेच तू वर्षभर चकरा मारत बसशील’ असे म्हणत टीडीआरच्या फाईलवर सही करण्यासाठी पैसे मागितल्या प्रकरणी महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष डौलात कामठे (३५, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली. तर महापालिकेचा कनिष्ठ अभियंता अनिल राऊत (५२, रा. सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – २० लाखासाठी तरुणाचे अपहरण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची पिंपळे निलख येथे साडेतेरा गुंठे जागा आहे. या जागेत ‘हाईव्ह ६५’ नावाचा बांधकाम प्रकल्प सुरु आहे. त्या बांधकामासंदर्भात टीडीआरचे काम करण्यासाठी संतोष सोमवारी महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागात गेले होते. त्यावेळी आरोपीने फाईलवर सही करण्यासाठी संतोष यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली. ‘तू मला पन्नास हजार रुपये दिले, तर तुझे काम होईल. नाहीतर असेच तू वर्षभर चकरा मारत बसशील’ असे आरोपीने म्हटले. तसेच टेबलवरील टोचा उचलून संतोष यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.