मतदारांना पैसे वाटप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या ‘या’ माजी आमदाराविरुद्ध गुन्हा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – मतदान करण्यासाठी मतदारांना पैशांचे अमिष दाखवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्यांच्या मोटारीतून रोकड जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी माजी आमदार अण्णा दादू बनसोडे (५०, रा. चिंचवड) आणि रवींद्र हृदयनाथ दुबे (४६, रा. कामगारनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शरद निवृत्ती आहेर यांनी तक्रार दिली आहे.

बनसोडे आणि दुबे हे दोघेजण लिंक रोड परिसरात पैसे वाटप करून मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांना घटनास्थळी एका स्विफ्ट मोटारीत दोघे बसल्याचे दिसले. पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता मोटारीच्या डिकीमध्ये ४८ हजार ५०० रुपयांची रोकड मिळून आली. या पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.