मंगळसूत्राला कुत्र्याचा पट्टा म्हणणे प्राध्यापिकेला पडले महागात, FIR दाखल

पणजी : पोलीसनामा ऑनलाईन – मंगळसूत्र (Mangalsutra ) म्हणजे कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा (Dog Neck Belt ) असे वादग्रस्त वक्तव्य करणा-या प्राध्यापिकेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साळंगावर विधी महाविद्यालयातील प्राध्यापिका शिल्पा सिंह यांनी सोशल मिडियावर हे आक्षेपार्ह विधान केले आहे.

राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनीचे राजीव झा यांनी याबाबतची फिर्याद दाखल केली आहे. शिल्पा सुरेंद्र प्रतापसिंह या नावाने फेसबुक प्रोफाईल असणा-या महिलेने धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने हे वादग्रस्त विधान केल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. तर सिंह यांनी राजीव झा हा वारंवार धमक्या देत असल्याची फिर्याद नोंदवली आहे. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या प्राध्यापिकेला महाविद्यालयातून काढून टाकण्याची मागणी महाविद्यालय प्रशासनाकडे केली आहे. मात्र यात अभाविपचा काहीही संबध नसल्याचे सांगत महाविद्यालय प्रशासनाने ही मागणी फेटाळून लावली. सिंह यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर धमक्या दिल्याबद्दल झा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान संबधित प्राध्यापिकेने अन्य एक पोष्ट लिहूून माझ्या या विचारामुळे कोणत्याही महिलेच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी माफी मागत असल्याचे सांगितले. मात्र आपल्या विचाराचे त्यात त्यांनी ठामपणे समर्थन केले आहे.