DGP सुबोध जायसवाल तुर्तास राज्यातच, महिन्याभरानंतर दिल्लीत ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांचा कार्यकाळ एक महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. अमूल्य पटनायक शुक्रवारी (दि.31) सेवानिवृत्त होणार होते. गृह मंत्रालयाने अमूल्य पटनायक यांचा कार्यकाळ एक महिन्यांनी वाढवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. अमूल्य पटनायक यांच्या जागी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती. मात्र, पटनायक यांना एक महिन्याची मुदतवाढ दिल्याने तुर्तासतरी सुबोध जायसवाल हे महाराष्ट्रातच राहणार आहेत. पटनायक यांच्या मुदतवाढीला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

दिल्ली आयुक्त अमूल्य पटनायक हे 31 जानेवारीला सेवानिवृत्त होणार असल्याने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांची प्रतिनियुक्ती होणार असल्याची चर्चा मागील आठवड्यापासून सुरु होती. मात्र, आता निवडणूक आयेगाने पटनायक यांची एक महिना मुदतवाढ दिल्याने या चर्चांवर सध्यातरी पडदा पडला आहे.

सुबोध जायसवाल हे केंद्र सरकारच्या मर्जीतले असल्याने त्यांना दिल्ली पोलीस आयुक्त बनवल्यास त्यांच्या जागी सेवाजेष्ठतेनुसार होमगार्ड महासमादेशक संजय पांड्ये यांचा दावा होता. परंतु फडणवीस सरकारने त्यांना अडगळीत ठेवले होते. त्यामुळे धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पांड्ये यांना महाविकास आघाडी न्याय देणार का, किंवा त्यांना डावलून दुसऱ्या कोणाची नियुक्ती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची मुदतवाढ 28 फेब्रुवारीला संपत आहेत. आता दिल्लीच्या आयुक्तपदी जायसवाल यांची निवड झाल्यास त्याचवेळी त्यांचा वारस निश्चित करावा लागणार आहे. मुंबई आयुक्तपदासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे परमबीर सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. तसेच सेवा ज्येष्ठतेनुसार संजय पांड्ये, पोलीस गृहनिर्माण बिपीन बिहारी, राज्य सुरक्षा महामंडळाचे के कनकरतनम, हेमंत नागराळे यांचा क्रमांक लागतो.