काय सांगता ! होय, अभियांत्रिकीच्या तरूणानं चक्क घरातच केली गांजाची शेती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चेंबूरमध्ये राहत्या घरातच अत्याधुनिक पद्धतीने गांजाची शेती करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून गुन्हे शाखेच्या कक्ष 3 च्या पथकाने ही कारवाई करून एका तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून पोलिसांनी त्याच्याकडून 1 किलो गांजा आणि 54 ग्रॅम एमडी हस्तगत केले आहे. तसेच त्याच्या मित्राच्या घरातून सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे चेंबूर, देवनार, आरसीएफ परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी निखिल शर्मा (वय-26) हा संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 2 लाख 90 हजार रुपये किंमतीचा एक किलो गांजा आणि 54 ग्रॅम एमडी आढळले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने मित्राच्या घरातच हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम या अत्याधुनिक पद्धतीने गांजाची लागवड करून गांजाचे उत्पादन केल्याचे समोर आले.

गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने चेंबूरच्या माहुल गावातील पालव बागेत छापा टाकला. त्या ठिकाणी उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेली तीन हायड्रोपोनिक ग्रो सिमेंटचे टेंड, कुंड्या, एलईडी लाईट, टायमर, आद्रता मापक, हायड्रोपोनिक न्युट्रियट्स, वेगवेगळ्या जातीच्या गांज्याच्या बियांसह, बी उगविण्यासाठी पेपर टॉवेल असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी उच्चशिक्षित तरुण
अटक करण्यात आलेला निखिल हा बीए झाला असून त्याने नुकतेच अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो मागील आठ महिन्यापासून गांजा विक्री करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आला. तेव्हा तो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. या गुन्ह्यातील अन्य दोघे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. फारार झालेले आरोपी देखील उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/