पतीच्या मदतीने प्रियकराला पिस्तुलाच्या धाकाने लुबाडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या पूर्वीच्या प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेऊन एका महिलेने पती व त्याच्या साथीदाराने पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रकार हिजंवडीमध्ये घडला आहे. हिजंवडी पोलिसांनी ही महिला, तिचा पती व इतर दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संध्या नाटक/मोडक, रोहित मोडक (रा. हडपसर) व त्यांचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकाळभोर येथील एका ३० वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार सूस येथील मायनेस्ट सोसायटीत १७ ते २० एप्रिल दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा तरुण आणि संध्या नाटक यांचे पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यानंतर संध्या हिने रोहित मोडक याच्याबरोबर विवाह केला. रोहित मोडक याला संध्या हिच्या पूर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती होती. त्यांनी या तरुणाला त्यावरुन लुबाडण्याचा कट रचला. त्यानुसार ते दोन कारमधून इतर दोन साथीदारांना घेऊन १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता सूस येथील मायनेस्ट सोसायटीत गेले. त्यांनी या तरुणाला हाताने मारहाण केली व डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. कोयता व पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील ३ तोळ्याची सोन्याची चैन व १० हजार ५०० रुपये असा ५६ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर या तरुणाने आपल्यावर उपचार करुन घेतले. त्यानंतर २० एप्रिलला ते पुन्हा आले व त्यांनी त्याच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच फोन करुन सातत्याने पैशांची मागणी सुरु केली. पैसे दिले नाही तर खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. या सततच्या त्रासामुळे शेवटी घाबरुन या तरुणाने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली. हिंजवडी पोलिसांनी जबरी चोरी, खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
You might also like