‘या’ माजी आमदार, ४ नगरसेवक / नगरसेविकांसह शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल ; एकास अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासमोर शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी शिवसेना उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह पक्षाचे नगरसेवक व कार्यकर्त्यांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी बूट फेकून मारणारा मदन आढाव याला पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक अशोक बडे, नज्जू पहिलवान, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, माजी नगरसेवक दत्ता सप्रे, मदन आढाव, शैलेश भाकरे, आकाश कातोरे, माजी आमदार अनिल राठोड, विशाल वालकर, गिरीष जाधव व इतर 20 ते 25 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

पोलिसांनी याप्रकरणी मदन आढाव यास तातडीने अटक केली आहे. गुन्हे दाखल झालेले आरोपी शहरातून पसार झाले आहेत त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे शिवीगाळ, दमदाटी आदी कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी प्रभारी शहर अभियंता विलास सोनटक्के यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.