धक्कादायक ! झोपलेल्या पत्नीच्या मानेवर त्याने केले सपासप वार, नंतर जाऊन बसला शेतात लपून

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाइन –  झोपलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीचा खून करून मक्याच्या शेतात लपलेल्या पतीला पोलिसांनी अतिशय शिताफीने अटक केली आहे. वंदना संमेश्वर कोणकेरी असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी संगमेश्वर कोणकेरीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडहिंग्लज तालुक्यातील जरळी येथील शेतवडीमध्ये कोणकेरी वसाहत आहे. या वसाहतीमध्ये 10 ते 11 घरे आहेत. याच ठिकाणी संगमेश्वर हा आपल्या पत्नीपासून विभक्त रहात होता. या दोघांचे 2013 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक चार वर्षाची मुलगी आहे. वंदना रोज सकाळी दूध आणण्यासाठी येत होती. मात्र, आज सकाळी ती दूध घेण्यासाठी आली नसल्याने तिच्या सासूने घरी जाऊन पाहिले. त्यावेळी ती रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणावर पडल्याचे दिसले.

वंदनाच्या सासून आरोडाओरडा करून इतरांना घटनास्थळी बोलावून घेतले. वंदनाच्या खांद्यावर आणि मानेवर सपासप वार करण्यात आले होते. दरम्यान वंदनाचा पती संगमेश्वर हा देखील घरात नसल्याने रात्रीच वंदना हिचा खून करून तो फरार झाल्याचे समोर आले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पोलिसांनी वंदनाचा पती संगमेश्वर याचा शोध घेत असताना तो मक्याच्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपी संगमेश्वर याला मक्याच्या शेतातून अटक केली.

संगमेश्वर याची मुलगी आजीकडे गेली होती. त्यामुळे वंदना आणि संगमेश्वर हे दोघेच घरात होते. काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडणं होत होती. याच भांडणाच्या रागातून संगमेश्वर याने पत्नी वंदनाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like