त्यानं ‘क्राईम पेट्रोल’ पाहून रचला जन्मदात्या आईच्या हत्येचा ‘कट’ !

खंडवा : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेशातील खंडवा शहरात एकाने क्राईम पेट्रोल मालिका पाहून जन्मदात्या आईच्या हत्येचा कट रचला व चक्क पाच दिवस तिचे शव एका पेटीत ठेवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संतोष पाटील (वय ३२) असे त्याचे नाव आहे. विमला बाई पाटील (वय ५०) असे खुन झालेल्या आईचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, कोतवाली ठाणे परिसरातील रामनगरमधील साई मंदिराजवळील नाल्यातून दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले. तेव्हा एका पोत्यात महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांना त्यात एक तरुण पाठीवर पोते घेऊन जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी परिसरातील नागरिकांना त्याबाबत विचारल्यावर त्यांनी तो संतोष पाटील असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी संतोष पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने आईचा खुन केल्याची कबुली दिली. पोलिसांनी खुनाच्या कारणाची चौकशी केल्यावर त्याने कारण सांगितले. ते ऐकून पोलीस अचंबित झाले.

पाटील यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे विमलाबाई संतोषला काम करुन पैसे कमविण्यासाठी सांगत असत. त्याला सल्ले देत होत्या. त्यामुळे त्याला आईचा राग होता. टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहून त्याने आपल्या आईची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पाच दिवस घरातील एका पेटीत लपवून ठेवला होता. पण, दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने आईचा मृतदेह पोत्यात भरला व रात्रीच्या वेळी पोते नाल्यामध्ये फेकून दिले होते.