आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – मुलाने घेतलेले पैसे परत करावेत यासाठी दिलेल्या त्रासामुळे आईने आत्महत्या केली. याप्रकरणी पाच जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगला नार्वेकर (६२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर आप्पा शिंदे, उद्धव शेळके ऊर्फ चिकू, मंगेवरू सुक्रे ऊर्फ मंगु, बबीता आणि गिता प्रवीण बराटे यांच्याविरोधात चिखली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंगला नार्वेकर यांच्या मुलाने आरोपींकडून महापालिकेत नोकरी लावण्याचा आमिषाने लाखो रुपये घेतले होते. मात्र, तो नोकरी न लावता पैसे घेऊन फरार झाला. यानंतर संबंधित लोकांनी घरी जाऊन मंगला यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला. तसेच ‘तुमचे जगणे असह्य करु’ अशी धमकी दिली. याला वैतागून अखेर मंगला यांनी त्यांच्या अपंग बहिणीसह घरातील ढेकुण मारण्याचे औषध पिले. यानंतर दोघी बहिणींवर पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचार सुरु होते.

दरम्यान रविवारी मंगला यांचा मृत्यू झाला. त्यानंतर निगडी पोलीस ठाण्यात सोमवारी मुलासह पोलिसांनी मयत आईवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मंगला यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहिली होती. त्यामध्ये आरोपी पैशांसाठी वारंवार त्रास देत असल्याचे सांगत नावे लिहिली होती. ही चिठ्ठी चिखली पोलिसांकडे असल्याने चिखली पोलिसांनी आरोपींवर मंगला यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास चिखली पोलीस करत आहेत.