चाकण पोलिस ठाण्यात 62 लाखाचा घोळ ; सहाय्यक उपनिरीक्षकावर गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण पोलिस ठाण्यातील मुद्देमालात तब्बल 62 लाख रूपयाचा घोळ करणार्‍या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात मुद्देमाल कारकुन म्हणुन कर्तव्यास हजर असलेल्यानेच घोळ घातल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी माहिती दिली आहे. पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र हरिदास चौधरी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम पासलकर यांनी फिर्याद दिली आहे. सध्या चाकण पोलिस ठाण्यात प्रलंबित असलेल्या गुन्हयांचा निपटारा करण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये हा सर्व घोळ उघडकीस आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन मुद्देमालात घोळ चालु असल्याचे चौकशीत निष्पन्‍न झाले आहे. शासकीय रक्‍कम, सोने आणि चांदी असा एकुण 62 लाख 26 हजार 523 रूपयाचा अपहार झाला आहे. याप्रकरणी भादंवि 406, 409, 188 सह मुंबई पोलिस कायदा कलम 145 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा अधिक तपास चाकण पोलिस करीत आहेत.