रविंद्र बर्‍हाटेसह इतर 13 जणांवर आणखी एक FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – केटरिंग व्यावसायिकाला धमकावत त्याचा बंगाल बळकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह साथीदारांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी खंडणी, धमकावणे अशा प्रकारचे 7 गुन्हे दाखल झाले आहेत.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात 58 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तयानुसार रवींद्र बऱ्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, परवेज जमादार, विशाल ढोरे, विनोद ढोरे, सुजीत सिंह, अस्लम पठाण, बालाजी लाखाडे, सचिन धिवार, विठ्ठल रेड्डी, गणेश आमंदे, नितीन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी केटरिंग व्यावसायिकाला धमकावत त्याचा मांजरी परिसरातील बंगला बळावण्याचा प्रयत्न केला. मुलगा तसेच पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून बंगला नावावर करून घेण्याचा प्रयत्न केला.

बेकायदा सावकारी करून आरोपींनी फिर्यादीला 60 टक्के व्याजदराने कर्ज दिले. व्याजाने दिलेली रक्कम परत घेण्यासाठी तसेच मालमत्ता नावावर करून देण्यासाठी आरोपींनी त्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांना अडचणीत आणण्यासाठी आरोपींनी प्रयत्न केले. या प्रकरणातील आरोपीं विरोधात अशा प्रकारचे गुन्हे नुकतेच दाखल झाले. या बाबतची माहिती फिर्यादी यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याबाबत त्यांनी तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रमेश साठे करत आहेत.