Pune News : फरार सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   वाहनांची जाळपोळ, दरोड्याच्या तयारी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनने अटक केली आहे. ही कारवाई कोथरुड येथील पेठकर बिल्डींग शेजारी असलेल्या बसस्टॉप येथे करण्यात आली. साहिल हनुंत हाळंदे (वय-19 रा. गणेश कॉलनी, सुतारदरा, कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन जाळपोळीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी साहिल हाळंदे याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत 1 जानेवारी रोजी कोथरुड येथील शिवशक्तीनगर येथे वाहने जाळल्याची कबुली दिली. तसेच डिसेंबर 2020 मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी कारवाई केली होती. त्यावेळी तो पळून गेल्याचे सांगितले. आरोपी साहील हा अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करत आहे. 2016 पासून आजपर्यंत त्याच्या विरुद्ध चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, दुखापत, दरोड्याची तयारी, वाहनांची जाळपोळ असे 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे एक सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.