फरार सराईत गुन्हेगार अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पाच वर्षांपासून जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

सागर राजेंद्र ठाकुर (रा. एकतानगर, चाकण) व दत्ता गुलाग सातपुते (रा. खेड) अशी अटक आरोपींची नावे आहे. चाकण पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यातील एकाला अटक करण्यात आली होती. मात्र दोघेजण फरार होते. हे दोघे फरार आरोपी चाकण आंबेठाण चौकात येणार असल्याची माहिती सहायक पोलीस फौजदार रविंद्र राठोड व पोलीस हवालदार दीपक खरात यांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून दोघांना अटक केली.

सागर आणि दत्ता हे दोघेही सराईत गुन्हेगार असून दोघांवरही जबरी चोरी आणि खूनासारखे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने कारवाई केली असून कसून तपास सुरु आहे.