गंभीर गुन्ह्यात फरार असलेला ‘तो’ सराईत अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – चार पोलीस ठाण्यात फरार असलेला आणि मोक्का, दरोडा, दरोड्याची तयारी आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास खंडणी दरोडाविरोधी पथकाने त्याला अटक केली आहे.
बंदर ऊर्फ दीपक राजू सावंत (२२, रा. गांधीनगर झोपडपट्टी, पिंपळे गुरव) याला अटक केली आहे.

तळेगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम मोक्का या गुन्ह्यात फरार असलेला बंदर सृष्टी चौक सांगवी येथे येणार असल्याची माहिती पोलीस नाईक निशांत काळे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस कर्मचारी अशोक दुधवणे, गणेश हजारे, उमेश पुलगम, निशांत काळे, विक्रांत गायकवाड, किरण खेडकर, नितीन खेसे, सुधीर डोळस यांच्या पथकाने सापळा रचला.

पोलिसांनी सृष्टी चौकात सापळा रचून बंदर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चौकशीसाठी त्याला खंडणी दरोडाविरोधी पथक गुन्हे शाखा येथे आणून कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. या कारवाईमुळे तळेगाव पोलीस ठाण्यातील एक हिंजवडी पोलीस ठाण्यातील दोन आणि सांगवी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तपास पोलीस करत आहेत.