‘FILMY STYLE’ ने पाठलाग करुन लूटमार करणारे अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर दुचाकीस्वाराला कोयत्याने मारहाण करुन लुटणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करुन अटक केली आहे. हा प्रकार चांदणी चौक बावधन येथे घडला.

विशाल फुलचंद माळी (१९), आशिष मारुती धनके (१९ दोघे रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरार आहे. या प्रकरणी रवींद्र अण्णा हिरेमठ (४९, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र हे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास बावधन येथे जात होते. चांदणी चौकात त्यांची दुचाकी बंद पडली. रस्त्याच्या बाजूला घेऊन दुचाकी चालू करण्याचा प्रयत्न करत असताना सीबीझेड मोटर सायकल वरून तिघेजण आले. त्यातील दोघांच्या हातात लोखंडी कोयते होते. दोघांनी रवींद्र यांना पकडले तर एकाने त्यांच्यावर वार केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्याकडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम असे एकूण सहा हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून धूम ठोकली.

याबाबत माहिती मिळताच हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, अजय जोगदंड आणि तपासी पथकाचे उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे यांनी दुचाकीचा पाठलाग केला. चोरट्यानी फिल्मी स्टाइल अनेकदा चकवा दिला. मात्र पोलिसांनी दुचाकी पकडली. यावेळी दोघांना अटक केली, एकजण फरार झाला.