पुणे : खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुंड तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खडक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. राहूल श्रीनिवास रागीर (२०, घोरपडे पेठ) असे तडीपार करण्यात आलेल्याचे नाव आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आपले गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळ्यांचा समूळ नायनाट करण्यासाठी त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश शहर पोलीस आयुक्त के. वेंकटेशम आणि सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिले आहेत. त्यानुसार रागीर याला तडीपार करण्यात आले आहे.

राहूल रागीर हा खडक पोलीसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी २०१७ मध्ये त्याच्याकडून १ वर्ष मुदतीत चांगल्या वर्तणूकीचे बंधपत्रही करण्यात आले होते. तो अत्यंत खुनशी, क्रूर व भांडखोर आहे. तो लोकांसोबत कुरापती काढून भांडण करतो. त्यामुळे परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे नागरिक त्याची तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्याच्या या कृत्यांमुळे परिसरातील शांतता व नागरीकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे.

म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप गायकवाड, महेश बारवकर, कर्मचारी महेश कांबळे, दिपक मोघे यांनी त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्याकडे पाठवून दिला. त्यानंतर त्यांनी या  प्रस्तावाला मंजूरी देऊन त्याला तडीपार करण्याचा आदेश दिला.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी समाज कंटक व अट्टल गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.