भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या पुतण्यासह ५ जणांवर गुन्हा

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – जेजूरी भागातील मागासवर्गीय महिलेची फसवणूक करत तिच्यावर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या पुतण्यासह ५ जणांवर जेजूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेवर दमदाटी करत तिचे दागिने पैसे, शेतजमीन विकून फसवणूक करण्यात आली.

पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ रामदास यादव (माळशिरस, ता. पुरंदर), सागर मोकाशी, रामदास यादव, अभिषेक अर्जून तापकिर( रा.धनकवडी), अभिषेक अनिल जगताप (सासवड, ता. पुरंदर) अशा पाच जणांवर अट्रॅसिटी आणि संगनमताने बलात्कार व फसवणूक केल्याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला विधवा असून जेजूरीजवळील गावात राहते. नवनाथ यादव याने चार वर्षांपुर्वीची ओळख काढत तिच्याशी  जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून चार वर्षांपासून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचे १० तोळे सोने व रोख ८ लाख २० हजार रुपये उसने घेऊन  ते परत केले नाहीत. तसेच मित्रांसोबत मिळून तिची दीड एकर जमीन विकली. ही जमीन विकण्यासाठी भाजपचे खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकिर यांचा पुतण्या अभिषेक तापकिर आणि त्याचा साथीदार अभिषेक जगताप या दोघांनी मिळून महिलेला फसवत तिचे कुलमुखत्यारपत्र तयार करून परस्पर जमीन विकण्यास मदत केली. महिलेने जमीन, पैसा आणि दागिन्यांची मागणी केल्यावर मात्र तिला सागर मोकाशी आणि रामदास यादव यांनी दमदाटी करत जातिवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव पुढील तपास करत आहेत.