अंत्ययात्रेस जाण्यास बंधन घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल

अंबरनाथ : पोलीसनामा ऑनलाइन – वीसाव्या शतकाकडे भारत जात असताना देखील देशात जुन्या रुढी परंपरा अजूनही तशाच आहेत. कंजारभाट समजातील विवाहीत दांपत्याने समाजाच्या जाचक रुढी परंपरांविरोधात आवाज उठवल्याने समाजातील नाराज झालेल्या काही लोकांनी त्यांना वाळीत टाकले. या दांपत्याच्या आजीचा मृत्यू झाला.

तिच्या अंत्ययात्रेस समाजातील कोणीही जाऊ नये असे आवाहन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन करण्यात आले. या विरुद्ध अंबरानाथ येतील विवेक तमायचिकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी व्हिडीओच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे.

अंबरनाथ येथील वांद्रापाडा परिसरात कंजारभाट समाजाची वस्ती आहे. या समाजात आजही जुन्या रुढीपरंपरा जपल्या जातात. या समाजातील कौमार्य चाचणीच्या प्रथेला विवेक तमायचिकर यांनी विरोध केला. पुण्यात देखील अशा प्रकारचे प्रकरण चांगलेच गाजले होते. यानंतर विवेक यांनी या चाचणीला विरोध केला होता.

सोमवारी रात्री विवेक यांच्या आजीचे निधन झाले. त्यावेळी या ठिकाणी सुरु असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावण्यात आला होता. आजीच्या निधनानंतर या ठिकाणी सुरु असलेला डीजे बंद होईल असे वाटले होते. मात्र, यावेळी पंचायतीच्या सदस्याने डीजे बंद करण्या ऐवजी विवेक यांना पूर्वी केलेल्या समजातील रुढीचा विरोध केल्याचा पाढा वाचला. तुमच्यामुळे समाजाची बदनामी झाल्याचा आरोप विवेक यांच्यावर करण्यात आला. तसेच काही समाजबांधवांनी व्हिडीओ व्हायरल करून अंत्ययात्रेत सहभागी न होण्याचे आवाहन केले होते.

विवेक तमायचिकर यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. समाजाचे सरपंच संगम गारुंगे, भूषण गारुंगे, करण गारुंगे, अविनाश गागडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.