यवतमाळ : जिल्हा बॅंकेतील 89 लाखांच्या अपहारप्रकरणी चौघांवर FIR दाखल

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन –   यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील 89 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी बुधवारी (दि. 17) रात्री उशिरा चौघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस आता या आरोपीचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी आर्णी शाखेचे व्यवस्थापक रणजित मधुकर गिरी यांनी आर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आर्णी शाखेच्या व्यवस्थापक योगीता सुनील पुसनायके ( वय 45 रा. यवतमाळ) , लेखापाल अमोल पांडुरंग मुजमुले (43 रा. जवळा ता. आर्णी) आणि रोखपाल विजय खुशालराव गवई (52, रा. यवतमाळ ) आणि अंकित दीपक मिरासे (35 रा. सुकळी ता. आर्णी ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळाळेल्या माहितीनुसार, 2018 पासून 12 मार्च 2021 पर्यंत प्राथमिक लेखापरीक्षणात 89 लाख 27 हजार 501 रुपयांची अफरातफर झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संचालक मंडळाने तिघांना तडकाफडकी निलंबित केले होते. तर कंत्राटी असलेल्या अंकितची सेवा समाप्त केली आहे. आरोपींनी संगनमताने 25 ग्राहकांच्या बॅंक खात्यातून रक्कम काढणे, त्यासाठी विड्रॉल स्लीप, चेक स्लीप याच्यावर खाडाखोड करणे, ग्राहकांच्या बचत खाते पुस्तकावर स्व:हस्ते एन्ट्री करून खोटे हिशेब तयार करणे, बॅंकेची फसवणूक करून न्यायभंग करणे, बॅंकेच्या खातेधारकांना ठगविणे आदी ठपका पोलिसातील तक्रारीत ठेवला आहे. आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहे.