पालघर साधू हत्याकांड : 808 संशयित, 154 अटक; CID कडून आरोपपत्र दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन साधू आणि एका चालकाच्या हत्येप्रकरणी सीआयडीकडून कोर्टात 4 हजार 955 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 16 एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी 154 जणांना अटक केली असून 11 अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पालघरमधील घटनेनंतर राज्यासह देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. सोबतच राज्य सरकारवर टीका होऊ लागली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीआयडीकडून आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी 808 संशयितांची चौकशी करण्यात आली असून 108 साक्षीदांरांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी 154 जणांना अटक करण्यात आलेली असून 11 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोणत्याही आरोपीला जामीनावर सोडण्यात आले नाही अशी माहिती सीआयडीने दिली आहे.