पुण्यातील सांगवीत सराईत गुन्हेगाराचा खून

पुणे/सांगवी : पोलीसनामा ऑनलाइन – सांगवीमध्ये सराईत गुन्हेगाराचा डोक्यात फरशी घालून खून केल्याची घटना आज (रविवार) दुपारी उघडकीस आली. सराईत गुन्हेगाराचा खून रात्री दीड ते दोनच्या सुमारास झाला असल्याची शक्याता पोलिसांनी वर्तवली आहे. निलेश खैराले उर्फ पिक्या (वय-३० रा. सांगवी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

औंध रुग्णालयाच्या पाठिमागे गायरान असून या ठिकाणी सराईत गुन्हेगार पिक्याचा मृतदेह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आढळून आला. या घटनेची माहिती सांगवी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिक्याच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला असून पूर्वीच्या भांडणातून खून करण्यात आला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सराईत गुन्हेगार पिक्यावर हाणामारी, खुनाचा प्रयत्न अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. औंध रुग्णालयाच्या पाठिमागील बाजूस जास्त वर्दळ नसल्याने त्या ठिकाणी त्याचा खून करण्यात आला असवा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषय वृत्त –