सांगलीमध्ये सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून, माजी नगरसेवक ताब्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

खूनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका सराईत गुन्हेगाराचा डोक्यात दगड घालून, कोयत्याने वार करुन खून करण्यात आला. ही घटना आज (मंगळवार) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास सांगली शहरातील हनुमाननगर येथील तिसऱ्या गल्लीत घडली. दरम्यान, याप्रकरणी माजी नगरसेवकाला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सराईत गुन्हेगाराचा खून पूर्वी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आला असल्याची चर्चा शहरात आहे.

गणेश बसाप्पा माळगे (वय 28, रा. त्रिमुर्ती कॉलनी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर माजी नगरसेवक राजू गवळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गणेश माळगे पत्नी, दोन मुलांसमवेत त्रिमुर्ती कॉलनीतील स्वामी समर्थ मंदिराजवळ रहात होता. सहा महिन्यांपूर्वी किरकोळ वादातून गणेशने धनंजय गवळी याच्यावर खुनी हल्ला केला होता. या गुन्ह्यात गणेशला अटक करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वीच या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास  गणेश  व प्रथमेश कदम यांच्यासोबत मोटारसायकलवरून (एमएच 10 सी के 3585) हनुमाननगर येथील तिसर्‍या गल्लीत राहणाऱ्या माजी नगरसेवक राजू गवळी याचेकडे गेले होते.

तेथून बाहेर पडल्यानंतर गणेशच्या ओळखीचा एकजण दिसल्यावर गणेश त्याला भेटण्यासाठी गाडीवरून खाली उतरला. यावेळी ओंकार पाटील तेथेच उभा होता. त्यावेळी एकजण तेथे आला त्याने मोटारसायकलची चावी काढून घेतली. त्यानंतर काही वेळातच धनंजय गवळी तेथे आला. त्याने पूर्वीच्या भांडणाचा जाब विचारायला सुरुवात केली. त्यानंतर गणेशने त्याच्या दोन्ही मित्रांना पळून जा असे सांगितले व तो स्वतःही तेथून पळून जाऊ लागला. काही अंतरावर गेल्यानंतर गणेश थांबला. त्यावेळी लपून बसलेल्या इतर दोघांनी आणि धनंजय याने गणेशच्या डोक्यात, मानेवर, हातावर वार केले. कोयत्याचे वार झाल्यामुळे गणेश तेथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्लेखोरांपैकी एकाने दगड गणेशच्या डोक्यात घातला.

घटनेनंतर हल्लेखोर पळून गेले. गणेशच्या मित्रांनी त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात हलवले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता.

घटनास्थळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकार्‍यांना तपासाच्या सूचनाही दिल्या. खुनाच्या घटनेनंतर हनुमाननगर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजी नगरसेवक राजू गवळी ताब्यात…

सहा महिन्यांपूर्वी माजी नगरसेवक राजू गवळी यांचा पुतण्या धनंजय याच्यावर गणेश माळगेने खुनी हल्ला केला होता. त्या गुन्ह्यात गणेशला अटक करण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर मंगळवारी गणेश मित्रांसमवेत गवळी यांच्या घरी गेला होता. त्यानंतर त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात गवळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गणेश याचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आला. त्याच्या डोक्यात, मानेवर, हातावर, पाठीवर तब्बल दहा वार करण्यात आले. मृत गणेश माळगे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्नासह मारामारीचे तीन गुन्हे विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल आहेत.
[amazon_link asins=’B07B7PTPB2,B00IZ95T7C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f7087bc7-a55d-11e8-bc86-ab8cfeb5218a’]