‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या तात्पुरत्या येरवडा कारागृहातून 2 कैदी फरार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या तात्पुरत्या येरवडा कारागृहातून दोन कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज पहाटे ते पसार झाले आहेत. त्यामुळे या तात्पुरत्या कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हर्षद हानिफ सय्यद (वय 20) आणि आकाश बाबूलाल पवार (वय 24) अशी पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश पवार याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तर हर्षद याच्यावर खडकी पोलिस ठाण्यात सोन साखळी चोरीचा (कलम 392) गुन्हा दाखल आहे. या दोघांना या गुन्ह्यात अटक केली होती. तसेच त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात गर्ल्स हॉस्टेल येथे तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आले आहे. त्याठिकाणी नवीन कैद्यांना ठेवण्यात येत आहे. त्यानुसार या दोघांना येथे ठेवण्यात आले होते. मात्र आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास दोघेही तेथून पसार झाले असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ याची माहिती पुणे पोलिसांना देण्यात आली. तर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आता या दोघांचा शोध घेण्यात येत आहे.