पिंपरीत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – गंभीर गुन्ह्यात अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात आणलेल्या एका आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. ही घटना वायसीएम रुग्णालय येथे मंगळवारी (दि. 26) दुपारी घडली.

आकाश बाबुलाल पवार (२१, रा. आयप्पा मंदीराजवळ, काळेवाडी), गणेश ऊर्फ अजय दत्तात्रय कांबळे (१९, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, नढेनगर काळेवाडी) आणि कृष्णा उत्तम सोनवणे (१९, रा. तापकीर मळा, चर्च समोर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आर. एस. मुदल यांनी मंगळवारी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलिसांनी तीनही आरोपींना एका गुन्ह्यात अटक करुन वैद्यकीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात मंगळवारी आणले. दुपारी एकच्या सुमारास आरोपींनी पोलिसांशी वाद घालत झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी कृष्णा सोनवणे आरोपी हा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्या विरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.