Pune News : ‘कोरोना’सेवक बनून पुणे पोलिसांनी खंडणीखोराला ठोकल्या बेड्या, डॉक्टर महिलेला मागितली होती 5 लाखाची खंडणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डॉक्टर महिलेला एकाने फोन करत तुमच्या नवऱ्याने तुमची व मुलाच्या खुनाची सुपारी दिल्याचे सांगत मुलाला न मारण्याचे 5 लाख रुपये खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. पण, पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणत त्या भामट्याला अटक केली आहे. पोलिसांनी कोरोना सेवक बनून गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. राकेश नरेश पाटील (रा. सय्यद नगर, मुळ छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या खंडणीखोराचे नाव आहे. त्याने एका महिला डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

फिर्यादी या डॉक्टर असून, त्यांचा बिबवेवाडी परिसरात दवाखाना आहे. तर त्यांच्या पतीचे मार्केटयार्ड येथे दुकान आहे. त्यांना एक मुलगा आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी फिर्यादी यांच्या मोबाइलवर एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. तसेच त्यांने फिर्यादी यांचे नाव घेऊन त्यांना मला तुमच्या पतीने 5 लाख रुपयांची सुपारी दिली असून, त्यात तुम्हाला अन मुलाला मारण्यास सांगितले आहे, असे सांगितले. पण मी लहान मुलांना मारण्याची सुपारी घेत नाही, त्यामुळे तुम्ही मला 5 लाख रुपये द्या असे म्हणत खंडणीची मागणी केली. दरम्यान या प्रकारामुळे फिर्यादी यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने घर गाठले आणि त्यांच्या पतीला व नातेवाईकांना हा प्रकार सांगितला. फिर्यादी व त्यांच्या पतीने मार्केटयार्ड पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठ निरीक्षक दुर्योधन पवार व उपनिरीक्षक शिंदे यांनी तात्काळ त्या व्यक्तीचा शोध सुरू केला. काही तासांत पोलीसानी या आरोपीला पकडले. यावेळी तो एका बांधकाम इमारतीत मजुरी करत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करुन आरोपीला अटक केली.

अशी केली कारवाई
सय्यदनगर येथील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर काहीजण कोरोना सेवक असल्याचे सांगून कामगारांची माहिती घेऊ लागले. एकेका कामगाराला बोलावून त्यांची माहिती टिपून घेतली जात होती. प्रत्येकाचा मोबाइल नंबर घेतला जात होता. त्यानंतर आरोपी समोर आला. त्याने मोबाइल नंबर सांगितल्यावर नंबर टिपून घेणाऱ्यांनी इशारा केला. दुसऱ्याने त्याला तुझ्या अंगात ताप असल्याचे दिसत आहे, तू जरा बाजूला उभा रहा म्हणून एका बाजूला घेऊन पकडले. त्याला पोलिसांनी आपले खरे रुप दाखवून त्याला पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी अत्यंत चलाखीने वेशांतर करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम, घुले यांच्या पथकाने केली.