Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, घरफोडीचे 5 गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथाने सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहे. मंगळवार पेठेतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून पावणे पाच लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

निखिल दत्ता थोरात (वय-24 रा. वाघोली) रवी ज्ञानेश्वर बोत्रे (वय-24 रा. कोथरुड), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय-22) अविनाश राजेंद्र कांबळे (वय-22), राहुल म्हसू शिंदे (वय-24 रा. लोणी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 2 कोयते, 5 मोबाईल, 2 दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चतु:श्रृंगी, उत्तमनगर, हिंजवडी, परांडा येथे प्रत्येकी 1, भारती विद्यापीठ 2 आणि कोथरुड पोलीस ठाण्यात 4 घरफोडी, जबरी चोरी, चोरी, दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. निखिल थोरात व किरण बोत्रे हे हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात 2019 पासून फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अजय थोरात यांना पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी काही जण जमले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवार पेठेतील प्लॅटिनम बिल्डिंग येथे उभ्या असलेल्या वॉटर टँकरच्या बाजूला थांबलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी फरासखाना 2, लोणीकंद 2 आणि हिजवडी येथील 1 अशा पाच घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 4 एलसीडी, 4 लॅपटॉप, 2 इस्त्री, बुट व रोख रक्कम असा एकूण 4 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दुड्डीकर, शशिकांत दरेकर, प्रशांत गायकवाड, तुषत्तर माळवदकर, महेश बामगुडे, सतिश भालेकर, अशोक माने, योगेश जगताप, सचिन जाधव, दत्ता सोनवणे यांच्या पथकाने केली.