विम्याच्या कोट्यावधींची रक्कम देण्याच्या अमिषाने १.५ कोटींचा गंडा घालणारी टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – IRDA मधून बोलत असल्याच्या बहाण्याने विमा पॉलीसीचे कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. त्याचे वेगवेगळे लाभ मिळविण्यासाठी वेगवेगळ्या बहाण्याने १ कोटी ५० लाख उकळणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

सुमीत वत्स टेकचंद शर्मा (३१, मेरठ रोड, गाजियाबाद), अंकुरसिंग पालेराम खुशवाह (३२), दुर्गेश सुभाषचंद्र शर्मा (४२, गाझीयाबाद उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत .

शिवाजीनगर येथील रहिवासी विजय केशव कानिटकर यांना बद्री प्रसाद, कोठारी, घोष प्रितम, सिताराम केसरी, चतुर्वेदी, अजय शर्मा अशा वेगवेगळ्या नावांनी काही जणांनी फोन केला. त्यांना आपण आयआरडीए चेन्नई मधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना इन्शुरन्स कंपनीबाबत माहिती दिली. त्यानंतर जुन्या पॉलीसी बंद झाल्या आहेत. त्या पॉलिसीचे व्याज, लाभ आणि बोनसचे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार असल्याचे अमिष दाखवले. त्यासाठी काही नवीन विमा पॉलिसी घ्याव्या लागतील व काही रक्कम फंड रिलीज करण्यासाठी टॅक्स भरावे लागेल असे सांगितले. हे पैसे भरल्याशिवाय लाभ मिळणार नाहीत,असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी १ कोटी ५९ लाख ९२ हजार ४०० रुपये भरले . परंतु त्यांना काहीच मिळाले नाही . त्यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर समांतर तपास करत असताना सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला .  तेव्हा त्यांना फसविणारे गाजियाबाद येथील राहणारे आहेत अशी माहिती समोर आली . त्यानंतर एका पथकाने तिघांना तेथे जाऊन अटक केली . त्यांना ट्रान्झीट रिमांडवर पुण्यात आणले.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, कर्मचारी अस्लम अत्तार, राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, नितीन चांदणे, अमित औचरे, बाळासाहेब कराळे यांच्या पथकाने केली.