आता विदर्भात पिकांवरील संकट ‘गडद’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – विदर्भात कापसावर पुन्हा एकदा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला सोयाबीनसह मूग, उडीद, तूर, ज्वारी पिकांना पावसाचा फटका बसला आहे. काही भागांमध्ये ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली. याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात अडकण्याची चिन्हे आहेत.

विदर्भातील शेतकर्‍यांपुढे विविध अडचणींचा मोठा डोंगर आहे. कधी नैसर्गिक, तर कधी कृत्रिम संकटांचा ससेमिरा शेतकर्‍यांमागे कायम असतो. यंदा कोरोना आपत्तीचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम झाला. त्यातून सावरत असताना बळीराजाने विविध पिकांची पेरणी केली. सदोष बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. या वर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पिके बहरली.

ढगाळ वातावरण व गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे विविध पिकांवर किडींचा प्रादुर्भाव व रोगराई आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगले उत्पादन होण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात 10 लाख हेक्टरवर कपाशीचे क्षेत्र आहे. गत चार वर्षांपासून बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. हंगामाच्या सुरुवातीला बोंडअळीला रोखण्यासाठी मान्सूनपूर्व पेरणी न करण्याच्या आवाहनासह जनजागृती करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असले तरी गुलाबी बोंडअळीने नुकसान पातळी गाठली आहे. विविध भागांमध्ये गुलाबी बोंडअळी आढळून आली.