फुटबॉलपटू रोनाल्डोला १५२ कोटींचा दंड व २३ महिन्यांची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (३३) याला मंगळवारी न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. टॅक्स घोटाळ्याप्रकरणी रोनाल्डो दोषी आढळला असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला १५२ (१८.८ मिलियन डॉलर) कोटी रुपयांचा दंड आणि २३ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. परंतु त्याचा गुन्हा अहिंसक असल्याने तो तुरुंगात जाणार नाही.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी रोनाल्डोवरील टॅक्स घोटाळ्याच्या आरोपांवर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी रोनाल्डो गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत न्यायालयात पोहोचला. यावेळी रोनाल्डोसह त्याचा रियल माद्रिदचा जुना साथी जाबी अलोंसोही होता. त्याच्यावरही टॅक्स चोरीचा खटला दाखल आहे. दरम्यान, ४० मिनिटांच्या सुनावाणीदरम्यान रोनाल्डोला न्यायालयाने १५२ कोटींचा दंड व २३ महिन्यांची शिक्षा सुनावली. परंतु त्याने आपला गुन्हा कबूल केल्याने व हा गुन्हा अहिंसक असल्याने स्पेनच्या नव्या कायद्यानुसार त्याला तुरुंगात जावे लागणार नाही.