‘त्या’ सेल्फीच्या व्हिडिओमुळं मुंबई पोलीस ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेल्फीच्या मोहापायी अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. जागृतीसाठी पोलिसांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नागरिकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओचे काहींनी स्वागत केले आहे, तर अनेकांनी हा व्हिडीओ विचलित करणारा असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांना ट्रोल केले आहे.

सेल्फीबद्दल जनजागृती करण्यासाठी टाकण्यात आलेला हा व्हिडिओ नेमका कोणता आहे आणि तो तरूण कोण आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नव्हते. या व्हिडिओला ट्रोल करत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ विचलित करू शकतो असा इशाराही दिला नाही तसेच हा व्हिडिओ पोस्ट करू नये असा काहींनी सल्ला दिला आहे. मात्र काहींनी या व्हिडीओचे समर्थन केले असून सेल्फीमुळे स्वतःलाही विसरणाऱ्यांसाठी हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनीही या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. पोलिसांनी हा व्हिडीओ चित्त विचलित करू शकतो, असा इशारा पोस्ट केला.

काय आहे व्हिडिओ

सर्वात साहसी सेल्फीचा प्रयत्न की एक बेजबाबदार पाऊल ? असे कॅप्शन लिहून मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये एक तरूण एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभा आहे. गच्चीच्या कठड्यावर उभा राहून तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. सेल्फीच्या नादात या तरुणाचा इमारतीवरून तोल जाऊन तो अचानक खाली कोसळतो असे दाखवण्यात आले आहे.