अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

पोलिसनामा ऑनलाईन – अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेडमधील तब्बल 83 हजार हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले. या मोठया नुकसानीची संबंधितांना भरपाई देण्यासाठी सुमारे 57 कोटींची मागणी प्रशासनाने शासनाकडे प्रस्तावित केली आहे.

उत्तरा नक्षत्राच्या पूर्वार्धात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामध्ये नांदेड, बिलोली, देगलूर, मुखेड तालुक्यात पावसाने अक्षरश: थैमान घातल्यामुळे खरीप क्षेत्र मोठया प्रमाणावर बाधित झाले आहे. हिमायतनगर, कंधार, लोहा, किनवट आणि माहूर हे पाच तालुके वगळता इतर 11 तालुक्यांतील 381 गावांमध्ये पिकांची हानी झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान वेगवेगळ्या भागांत पावसाचा जोर होता. काही भागात वीज कोसळून जनावरे मृत्युमुखी पडली. पीक नुकसानीत बिलोली तालुका अव्वलस्थानी आहे. तेथे 46 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 41 हजार हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. देगलूर तालुक्यात 58 हजार क्षेत्रापैकी 17 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले, तर मुखेड तालुक्यात 20 हजार हेक्टर क्षेत्राला पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्याच्या अनेक भागांत अतिवृष्टीचा फटका बसला. त्यात काढलेले आणि काढणीला आलेले पीक उद्धवस्त झाले तर यंदा चांगल्या स्थितीतील पिकांना अतिवृष्टीने अक्षरश: आडवे केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like