Pune News : सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने नगर, पुणे, कोल्हापूरमधील तरुणांची दीड कोटींची फसवणूक, भामट्याला पुणे पोलिसांकडून बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शासनाच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अनेकांना दीड कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या भामट्याच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या भामट्याने पुणे, नगर आणि कोल्हापूरमधील अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. विजयकुमार श्रीपती पाटील (वय-54 सध्या रा. ई-606, ललित, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुण, मुळ रा श्रीकृष्ण कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला हवेली पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी कोल्हापूर येथील प्रमोद रामचंद्र आयरेकर यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आरोपीने प्रमोद यांची 12 लाखांची फसवणूक केली होती. फिर्यादी प्रमोद यांच्या पत्नीला पुण्यातील ससून रुग्णालयात नोकरी लावण्यासाठी आरोपीने 12 लाख रुपये घेतले. विशेष म्हणजे त्यांना निवड झाल्याचे पत्र देखील दिले. मात्र, प्रत्यक्षात ससून रुग्णालयात खात्री केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे प्रमोद यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाटील विरोधात हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम हे तपास करत आहेत.

अकोले येथेही अनेकांना गंडा
विजयकुमार पाटील याने अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील 17-18 जणांना तब्बल सव्वा कोटींच्या वर गंडा घातला आहे. अनुदानीत शैक्षणिक संस्थेत लिपिक, शिपाई, शिक्षक या पदांवर नोकरी लावतो असे सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी 8-10 लाख रुपये पाटीलने घेतले होते. या संदर्भात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.

मोठ्या टोळीची शक्यता
आरोपी विजयकुमार पाटील याच्यासह इतर काही खासगी संस्था चालक व काही सावज होणारे एजंट अशी मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. कारण अकोले तालुक्यातील तरुणांना शिरुर तालुक्यातील काही संस्थामध्ये नियुक्तीही देण्यात आली होती. मात्र, त्या संस्था विनाअनुदानित असल्याचे पुढे या तरुणांच्या लक्षात आले.

फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे – पोलीस अधीक्षक
आरोपी विजयकुमार पाटील याने इतरही अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असल्याने संबंधितांनी पुणे ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधावा व तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे. हे फसवणुकीचे संपूर्ण रॅकेट उघडकीस आणले जाणार आहे, तसेच अशा आमिषांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.