जेजुरीच्या खंडोबाच्या नावे करोडो रुपयांच्या जमिनी

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन बांधवचा लोकदेव असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये करोडो रुपये किमतीच्या बागायती जमिनी असल्याची माहिती आता उघड होत आहे. या जमिनी पूर्वीच्या काळातील भाविक भक्तांनी देणगीद्वारे खंडेराया चरणी दिलेल्या इनाम वतन वर्ग एक, दोन, तीन वर्गवारीत असल्याचे समजते.

विश्वस्त मंडळाने या जमिनींबाबत माहिती संकलित करून नोंदी ७/१२ व फेरफार उतारे नकाशांच्या नकला मिळविण्याचे काम सुरु केले आहे. या कामाला यश मिळत आहे, मात्र मागील काळातील विश्वस्त मंडळीना काही जमिनींचा अपवाद वगळता कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे देवसंस्थानकडे स्थावर जंगम मालमत्तेचे कोणतेही दप्तर अथवा नोंदी नसल्याने शेतजमिनी शोधण्यात अडथळा निर्माण होत आहे. केवल ऐकीव माहितच्या आधारेच जमिनी शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.

श्री खंडोबा देव, श्री मार्तंड देव, श्री मल्हारी देव जेजुरी या नावे ७/१२ उताऱ्यावर नोंदी असलेल्या जमिनी पश्चिम महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील गावांमध्ये आढळून येत असल्या तरी ताबा व कसणारे इतर किंवा तेथील स्थानिक शेतकरी आहेत. विशेष म्हणजे या जमिनी बागायती असून कसणारे व ताबा असलेले शेतकरी देवसंस्थानला कसलेही उत्पन्न देत नाहीत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर, (सणसर, तरंगवाडी), फलटण, (सांगवी ) पुरंदर ( पिसर्वे ) येथे देवसंस्थानच्या मालकीच्या शेतजमिनी असून दोन महिन्यांपूर्वी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात, फलटण तालुक्यातील गिरवी या गावी कोट्यवधी रुपयांची शेतजमीन खंडोबा देवाची असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सदरील जमिनींची कागदपत्रे देवसंस्थान विश्वस्त मंडळाने उपलब्ध केली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यामध्ये महसूल प्रशासनाकडून खंडेरायाच्या इनाम वर्ग जमेनींची माहिती ‘माहिती अधिकार’ कायद्यात मागविली आहे.

याबाबत माहिती देताना देवसंस्थान विश्वस्त शिवराज झगडे यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी ७ विश्वस्तांची नियुक्ती धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून केली. भाविकांच्या सोई सुविधांचे व सामाजिक हिताचे अनेक निर्णय घेतले. त्याचबरोबर सध्याच्या विश्वस्त मंडळाने उपन्न वाढीवरही लक्ष केंद्रित केले. त्याच माध्यमातून देवसंस्थनच्या इनाम वर्गातील जमिनी असल्याची माहिती मिळाली व कागदपत्रे उपलब्ध सुरुवात करण्यास केली.

त्याद्वारे खेड तालुक्यामध्ये ११ एकर व फलटण तालुक्यामध्ये १३ एकर जमीन मल्हारी मार्तंडाची असल्याची कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्रातील शेतजमिनीच्या बाबत सध्या माहिती घेण्याचे व कागदपत्रे उपलब्ध करण्याचे काम विश्वस्त मंडळ करीत आहे . किमान शेकडो एकर जमीन जेजुरीच्या खंडेरायाची असावी असे म्हणल्यास वावगे ठरू नये.

Visit : Policenama.com