पुणे भाजपाकडून आचारसंहितेचा भंग ; गुन्हा दाखल  

पुणे ( चंदननगर) : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपाच्या वतीने वडगावशेरी येथे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (दि.२७) करण्यात आले होते. या बैठकीला कायदेशीर कोणतीही परवानगी न घेता आयोजन करून भाजपाकडून आचारसंहितेचा भंग केला. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगररस्त्यावरील शिवांजली मंगल कार्यालयात भाजपाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला चंदननगर पोलिस ठाण्याकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तसेच या बैठकीमध्ये स्पीकर लावून आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार ए.पी.ओव्हाळ राज्यकर अधिकारी विक्रीकर भवन यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बुधवार पासून वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ येथे निवडणूक कार्यालय येरवडा पुणे भरारी पथकातील प्रमुख म्हणून ओव्हाळ यांची नेमणूक करण्यात आलेले आहे. यांनी आरोपी  भारतीय जनता पार्टीचे वडगावशेरी विधानसभा अध्यक्ष संतोष लक्ष्मण राजगुरू यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर बैठकीला भाजपचे वडगावशेरी अध्यक्ष संतोष राजगुरू यांनी परवानगी मागितली होती मात्र ही परवानगी आचारसंहिते मध्ये किमान २४  ते १८ तास अगोदर मागणे गरजेचे असून ती उशिरा मागितल्यामुळे परवानगी देऊ शकलो नाहीत व त्यांच्या वरती कलम १८८ गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले.