जेजुरीत उसळली लसीकरणासाठी पुणेकरांची गर्दी,लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्या – विजय शिवतारे

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाइन –  पुरंदर तालुक्यातील जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. पण याचा लाभ पुरंदरवासियांनी कमी आणि पुणेकरांनीच जास्त घेतल्याचे दिसत आहे. याबाबत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचेशी चर्चा करून लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून द्यावे अशी मागणी केली आहे.

याबाबत शिवतारे म्हणाले, जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे १८ ते ४४ वयोगटासाठी जवळपास ७०० डोस उपलब्ध करून देण्यात आले होते. लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असल्याने यापैकी जवळपास ८० टक्के लस ही तालुक्याबाहेरून नोंदणी केलेल्या लोकांना द्यावी लागले. पुणे, पिंपरी चिंचवडसह बारामती, दौंड, अशा आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा लोकांनी जेजुरी केंद्रासाठी नोदणी केलेली आहे. लोक नोंदणी करून थेट जेजुरीला येत आहेत. पुरंदर तालुक्यातील जेमतेम ६५ ते ७० लोकांना यात लस मिळाली. जेजुरी शहरातील तर केवळ हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच नागरिक यात समाविष्ट होते. त्यामुळे तालुक्यातील लोक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.

शिवतारे पुढे म्हणाले, लसीकरण केंद्रांना कार्यक्षेत्र ठरवून देण्यात यावे अशी मागणी मी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या त्या तालुक्यातील लोकांना तेथील केंद्रात लसीकरणाचा लाभ घेता येईल.