जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू , जमावाकडून गाडीची तोडफोड

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना घडली आहे. यानंतर तेथे जमलेले लोक संतप्त होत त्यांनी गाडीची तोडफोड केली. सोलापूरमधील ही घटना आहे. या अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातावेळी तानाजी सावंत गाडीत नव्हते. बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये हा अपघात झाल्याची माहिती आहे.

तानाजी सावंत यांच्या फॉर्च्युनर कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शामकुमार देविदास व्हळे (वय 40 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. बार्शी-लातूर बायपास रोडवरील बीआयटी महाविद्यालयाजवळ असलेल्या शेलगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. यानंतर तेथील संतप्त जमावाने तानाजी सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली.

तानाजी सावंत त्यांच्या फॉर्च्युनर कारमधून त्यांचे नातेवाईक प्रवास करत होते. या अपघातात मृत पावलेले शामकुमार व्हळे हे शेलगावचे रहिवासी होते. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

 

Visit : Policenama.com