धक्कादायक ! ‘कोरोना’बाधिताच्या अंत्यविधीला गर्दी, संकट आणखी गडद

पोलिसनामा ऑनलाईन टीम – ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाने कोरोना चाचणी अहवाल येण्यापुर्वीच एका रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यामुळे या रुग्णाच्या अंत्ययात्रेात इंदिरानगर भागात मोठया संख्येने रहिवाशी जमले होते. त्यामुळे दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या आणखी एका मोठया परिसरावर कोरोनाचे संकट गडद झाले आहे.

ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये 15 दिवसांपुर्वीअशीच घटना घडल्यामुळे 80 जणांचे विलगीकरण करण्यात आले होते. तसेच शेकडो नागरिकांच्या चाचण्या करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर ओढवली होती. याप्रकरणी आता सखोल चौकशी करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील इंदिरानगरमधील डोंगर टेकडीवर हनुमाननगर वसले असून तेथे दाटीवाटीची वस्ती आहे. याच भागातील एका 50 वर्षीय रुग्णाला काही दिवसांपुर्वी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे 30 एप्रिलला त्याचा मृत्यु झाला. या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल येण्यापुर्वीच रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

नेकांनी मृतदेहाचे अंत्यदर्शन घेतले तर मोठ्या संख्येने रहिवाशी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. दरम्यान, दोन दिवसानंतर त्याचा कोरोना चाचणी अहवाल आला आणि मृत व्यक्ती कोरोनाबाधित होती, असे स्पष्ट झाले. या प्रकारानंतर महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली असून मृतदेहाचे अंत्यदर्शन घेणारे आणि अंत्ययात्रेत सामील झालेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या नागरिकांचा आकडा शेकडोच्या घरात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.