CRPF संचालक कुलदीप सिंह यांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘छत्तीसगडमध्ये 22 जवान शहीद होणे याला गुप्तचर यंत्रणेच अपयश म्हणणे चुकीचे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   संरक्षण दलाचे जवान आणि नक्षलवाद्यात शनिवारी छत्तीसगडच्या जंगलात झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी घडवलेले हे अलीकडच्या सर्वात मोठे हत्याकांड आहे. यावेळी जवानांनी जवळपास 25 ते 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून नेमकी संख्या हाती आली नाही. दरम्यान चकमक झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) संचालक कुलदीप सिंह हे तिथे पोहचले आहेत. सिंह यांनी एएनआयशी बोलताना म्हणाले की, हे गुप्तचर यंत्रणा किंवा ऑपरेशनल अपयश होते असे म्हणण्यात काही अर्थ नाही. जर हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असते, तर संरक्षण दलाचे जवान ऑपरेशनसाठी गेले नसते. आणि जर हे ऑपरेशनल अपयश असत तर इतक्या मोठ्या संख्येत नक्षलवादी मारले गेले नसते.

कुलदीप सिंह यांनी आपण जखमी जवानांची भेट घेणार असल्याची माहिती यावेळी दिली. चकमकीत शहीद झालेल्या जवानांमध्ये डिस्ट्रिक्ट रिझव्‍‌र्ह गार्ड च्या 8, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकाच्या 7, स्पेशल टास्क फोर्सच्या 6 आणि सीआरपीएफ’च्या बस्तरिया बटालियनच्या 1 जवानाचा समावेश असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले. कोब्रा पथकाचे अनेक जवान अद्याप बेपत्ता असून त्यांचा जंगलात शोध सुरु आहे. नक्षलवाद्यांनी नियोजनपूर्वक हा घातपात घडवला, परंतु संरक्षण पथकांचे जवान त्यांच्याशी धैर्याने लढल्याचे ते म्हणाले. तेकलगुडा गाव आणि परिसरातील छोटय़ा टेकडय़ांवर मोक्याच्या जागांवरून सुमारे 400 नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून या हल्ल्याची माहिती घेतली. चकमकीतील जवानांचे बलिदान कायम स्मरणात राहील आणि शांततेच्या शत्रुविरोधातील लढाई यापुढेही सुरू ठेवण्यात येईल, असेही शहा यांनी स्पष्ट केले.