संतापजनक ! DIG नं आपल्याच जवानावर फेकलं ‘गरम’ पाणी, जवान ‘गंभीर’ जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या राजगीरमध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात एका डीआयजीने आपल्याच जवानावर गरम पाणी फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांनी माहिती दिली आहे की, जवानाचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला आहे. त्याच्याशी कोणाचाही संपर्क होऊ दिला जात नाही. त्याच्यावर दबाव टाकून असं सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे की, चुकून थर्मासमधील गरम पाणी त्याच्यावर पडलं आहे.

दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयातील अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की, घटनेचा तपास होत आहे. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर कारवाई केली जाईल. आरोपी अधिकाऱ्याचं नाव डीके त्रिपाठी सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 64 बटालियनचा जवान अमोल खरात अटॅच ड्युटीमुळे राजगीर मधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहे. परीक्षा सुरू होत्या. यासाठी बनवलेल्या बोर्डमध्ये बाहेरूनही अनेक अधिकारी आले होते. अमोलची ड्युटी जीओ मेसमध्ये होती. बोर्डमध्ये आलेल्या एका डीआयजीने कसल्या तरी कारणावरून राग व्यक्त केला. त्याने गरम पाणी आणण्यास सांगितलं. त्यानुसार त्या अधिकाऱ्याला थर्मासमध्ये गरम पाणी देण्यात आलं. त्याने अमोल या जवानावरच ते पाणी फेकलं. या पाण्याने जवानाचा चेहरा, छाती आणि गळा जळाला. अधिकाऱ्याने त्या जवानाच्या जर्सीतही गरम पाणी टाकलं.

सीआरपीएफ मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ही घटना खरी आहे. मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने घटनेत थोडा बदल केला आहे. ते म्हणाले की, डीआयजीने ते पाणी पिलं तर त्याचं तोंड भाजलं याचाच राग आल्याने डीआयजीने रागात अमोलला बोलावलं आणि पाणी चेक करायला सांगितलं. त्याला पाणी प्यायला सांगितलं. तो पाणी पिताना त्याच्या अंगावर सांडलं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/