CRPF जवानांचे कौतुकास्पद कार्य, जखमीला उपचारासाठी खांद्यावरून 5 किलोमीटर नेले

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगड येथील नक्षलवादी आणि जवान यांच्यात झालेल्या चकमकीच्या बातम्या येत असतात. मात्र कोणताही जवान नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असतो याचि प्रचिती एका घटनेवरून आली. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये काही जवान जखमी व्यक्तीला खांद्यावरून नेताना दिसत आहेत. या फोटोबाबतचे गूढ आता उकलले आहे.

बिजापूर मधील अती दुर्गम भागात एका जखमी व्यक्तीला उपचारासाठी खांद्यावर घेऊन सीआरपीएफच्या जवानांनी तब्बल ५ किलोमीटर अंतर पार केले आहे. जवानांनी केलेल्या कौतुकास्पद कार्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जवानांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

छत्तीसगडमधील बिजापूरच्या नक्षलग्रस्त भागात एक व्यक्ती ट्रॅक्टरमधून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. अती दुर्गम भाग असल्यामुळे या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे जखमी व्यक्तीला वेळेवर उपचार मिळावे यासाठी सीआरपीएफच्या कोब्रा बटालीयनच्या जवानांनी जखमीला खाटेवर झोपवून, खाट खांद्यावर घेऊन तब्बल ५ किलोमीटरचे अंतर पार करत रुग्णालयात दाखल केले. सध्या या व्य़क्तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जवानांच्या या कार्याबद्दल त्यांचे सर्वांकडून कौतुक होत आहे.