गृह प्रवेशाआधीच अमरावतीतील CRPF जवान श्रीनगरमध्ये शहीद

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे प्रजासत्ताक दिनाच्या बंदोबस्तादरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये अमरावतीचे सुपुत्र असलेले सीआरपीएफचे जवान पंजाब जनीराम उईके (वय-48 रा. मणिकपूर, अमरावती) यांना गोळी लागल्याने वीरमरण आले.

उईके हे 2002 मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. नागपूर मुख्यालय अंतर्गत सीआरपीएफच्या सेकंड बाटलियनमध्ये त्यांनी सुकमा येथे सेवा दिली होती. त्यांची नुकतीच जम्मू-काश्मीरमध्ये बदली होती. दोन वर्षांनी त्यांच्या सेवेचा बाँड संपणार होता. त्यांनी वरूड येथे नुकतेच नवे घर घेतले होते.

त्यांच्या पश्चात आई रखमाबाई (वय-70) तीन भाऊ, पत्नी चंद्रा (वय-42) नववीत शिकणारा मुलगा व पाचवीत शिकणारी मुलगी असा परिवार आहे. उईके यांचा सार्वजनीक कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग असायचा. गावी आलेल्या वॉटर कप स्पर्धेसारख्या सामाजित उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

उईके यांचे पार्थिव आज (बुधवार) रात्री पर्य़ंत वरूडला आणले जाणार आहे. वरूड या तालुक्याच्या ठिकाणी शहीद पंजाब उईके यांच्या पार्थिवाला रॅली कढून सन्मान देण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.30) त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी माणिकपूर येथे नेण्यात येणार आहे. याठिकाणी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिमसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

फेसबुक पेज लाईक करा