देशासाठी 2 दिवसात 2 Good News ! मोदी सरकारला आणखी एक मोठा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युरोपमध्ये कोरोनाची (Corona) दुसरी लाट आल्यानं चिंता आणखी वाढली आहे. युरोपमधील काही देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं खनिज तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. लॉकडाऊनमुळं आता खनिज तेलाच्या मागणीत पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. खनिज तेल निर्यात करणाऱ्या देशांनी उत्पादन कायम राखल्यानं दरात मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडचा सध्याचा दर 37 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे. त्यामुळं सध्याच्या घडीला खनिज तेलाचे दर हे पाण्यापेक्षाही कमी झाले आहेत. मोदी सरकारला ऑक्टोबरमध्ये जीएसटीमधून 1 लाख कोटींपेक्षा अधिक महसूल मिळाला आहे. कालच याबद्दलची आकडेवारी अर्थ मंत्रलयानं दिली आहे. त्यानंतर आता खनिज तेलच्या घसरणीचं वृत्त समोर आलं आहे.

खनिज तेलाचा दर सध्याच्या घडीला 37 डॉलर प्रति बॅरल एवढा आहे. एका बॅरलमध्ये 159 लिटर तेल असतं. सध्याच्या घडीला एका डॉलरची किंमत ही 74 रुपये आहे. त्यामुळं एका बॅरलसाठी 2 हजार 733 रुपये मोजावे लागतात. त्यामुळं एक लिटरचा दर काढला तर तो 17.18 रुपये एवढा होतो. देशात एक लिटर बाटलीबंद पाण्यासाठी सध्या 20 रुपये मोजावे लागतात. त्यामुळं पाण्यापेक्षाही खनिज तेल स्वस्त झालं आहे.

भारत आपल्या गरजेच्या 83 टक्क्यांहून अधिक खनिज तेल आयात करतो. यावर दरवर्षी 100 अब्ज डॉलर एवढी रक्कम खर्च होते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर असल्यानं तेल आयातीवर होणार खर्च खूपच जास्त आहे. आता खनिज तेलासाठी झालेली घट मोदी सरकारसाठी दिलासादायक ठरू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात आतापर्यंत अनेकदा खनिज तेलाच्या दरात घसरण होऊनही मोदी सरकरानं देशातील पेट्रोल, डिझेलचे दर कमी केलेले नाहीत.

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Prices) दरात कपात न केल्यानं सरकारला 2 फायदे होतात. एक म्हणजे इंधनावरील करांमुळं चालू खात्यावरील तूट कमी करण्यात हातभार लागतो. दुसरं म्हणजे महसुलातही वाढ होते. गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य सुधारलं आहे. डॉलरच्या तुलनेत 77 रुपयांपर्यंत असलेला रुपया हळूहळू 74 वर आला आहे.